Loading
उत्तरे पाहण्यासाठी कृपया खालील प्रश्नांवर क्लिक करा:

1.मेडिक्लेम काय आहे?

मेडिक्लेम एक आरोग्य विमा आहे. मेडिक्लेम इन्शुरन्स कव्हर, रुग्णालयात दाखल असणाऱ्यांची खर्चा संदर्भात खालील परिस्थितीत जास्तीत जास्त विमा रक्कम देण्यासाठी बांधील आहे:

  1. अचानक उद्भवलेला आजार.
  2. अपघाता बाबतीत.
  3. कोणतीही शस्त्रक्रिया, कोणताही रोग, जे पॉलिसी कालावधीत निर्माण झाले आहेत.

2.विमा कंपनी आणि टीपीए यांच्यामध्ये काय फरक आहे?

थर्ड पार्टी प्रशासक (टीपीए), आरोग्य विमा देणाऱ्या कंपन्यांना आपली सेवा प्रदान करतात. टीपीए आपल्या आरोग्य सेवा पुरवणाऱ्या संस्थांचे जाळे, वैद्यकीय प्रमाणीकरण, दावा व्यवस्थापन, ग्राहक सेवा, तज्ञांचे मत इत्यादी मूल्यवर्धित सेवांद्वारे आरोग्य विमा पॉलिसीच्या सुरळीत कामाकाजासाठी मदत करते.

3.मी हेल्थ इंडिया टीपीए च्या कॉल सेंटर / कार्यालयात कॉल करेल तेव्हा तुम्ही मला कसे ओळखाल?

कृपया आपला पॉलिसी क्रमांक किंवा ओळखपत्र क्रमांक आम्हाला सांगा. आपली ओळख पटल्यानंतर आम्ही आपल्या दावा / कार्ड संदर्भात प्रश्नांना उत्तरे देऊ.

4.टीपीए च्या सेवांचा लाभ घेताना अवलंबून असलेल्या परिवाराच्या सदस्यांच्या स्थानाचा काही परिणाम होतो का?

नाही, परिवाराच्या सदस्यांच्या स्थानाचा फरक पडत नाही. मुख्य सदस्य किंवा अवलंबून असणारे सदस्य हे त्यांच्या स्थानाचा विचार न करता सर्व लाभ घेऊ शकतात. टीपीए चे आरोग्य सेवा प्रदान करणाऱ्या संस्थांचे जाळे देशभरात पसरलेले आहे.

5.पॉलिसी कालावधीत नाव बदलल्याने काय फरक पडतो?

जर विमा कंपनीला पूर्वसूचना दिली नसेल तर असा दावा नाकारला जाऊ शकतो. जर नावात काही बदल असेल तर संबंधित विमा कंपनीला सुचना देऊन त्यांची तशी मान्यता मिळवणे आवश्यक आहे आणि हे दावा दाखल करण्यापूर्वी करणे आवश्यक आहे.

6.दावा विमा कंपनीमध्ये दाखल करावा की टीपीए मध्ये?

शक्यतो फक्त टीपीएमध्ये.

7.जर मी पॉलिसी अवधीमध्ये माझ्या निर्धारित विमा रकमेचा उपयोग केला नाही तर मी ती रक्कम पॉलिसीचे नुतनीकरण करताना पुढील अवधीसाठी वापरू शकतो का?

नाही, निर्धारित विमा रक्कम पॉलिसीचे नुतनीकरण करतेवेळी आपण पुढील अवधीसाठी वापरू शकत नाही.

8.परतफेड दावा टीपीए मध्ये दाखल करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय आहेत?

परतफेड दावा टीपीए मध्ये दाखल करण्यासाठी आपल्याला खालील कागदपत्रे मूळ स्वरूपात देणे आवश्यक आहे.

  • * रुग्णालयाचे डिस्चार्ज कार्ड.
  • * रक्कम प्रमाणीकृत करण्यासाठी विमाधारक व्यक्तीने साक्षांकित केलेली रुग्णालयातील आंतररुग्ण बिले.
  • * बिलांबरोबर तपास अहवाल.
  • * डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे आणि त्याबरोबरीची औषध विक्रेत्याची बिले.
  • * विमाधारक व्यक्तीने स्वाक्षरी केलेला दावा फॉर्म.
  • * वैद्यकीय आणि शल्य क्रियेसाठी वापरल्या गेलेल्या उपभोग्य आणि टाकाऊ वस्तूंचा तपशील. (त्यांचे तपशीलवार विश्लेषण)
  • * डॉक्टरांच्या सल्ल्याची टिपणे आणि त्यांची बिले.
  • * आंतररुग्ण केस पेपर / ऑपरेटिव्ह नोट्स ची छायाप्रत.
  • * टीपीए ओळखपत्राची कॉपी किंवा चालू पॉलिसीची कॉपी आणि (असल्यास) मागील वर्षांच्या पॉलिसीची कॉपी.
  • * दाव्याची छाननी केल्यानंतर टीपीए ने मागितलेले आणखी कागदपत्र.

9.परतफेडीचा दावा टीपीए कडे कसा पाठवला जाऊ शकतो?

परतफेड दावा अधिकृत पोस्ट / कुरिअर च्या माध्यमातून आमच्याकडे पाठवला जाऊ शकतो किंवा आमच्या शाखांमध्ये प्रत्यक्ष दिला जाऊ शकतो.

10.वैद्यकीय खर्चाची पॉलिसी अवधिच्या पहिल्या दिवसापासून परतफेड केली जाते का?

हो, जर आपल्या पॉलिसीमध्ये अशी अट असेल की "30 दिवसांचे वाट पाहणे माफ केले आहे". परंतु हे दाव्याचे स्वरूप आणि इतर नियम यावर अवलंबून आहे.

11."बिगर वैद्यकीय खर्च" म्हणजे काय?

आपली आरोग्य विमा पॉलिसी योग्य आणि आवश्यक वैद्यकीय खर्चासाठी आहे. अशा अनेक वस्तू आहेत ज्या वैद्यकीय खर्चासाठी मान्य नाहीत (विमा कंपनीवर अवलंबून), अशा वस्तूंचा खर्च आपल्याला करावा लागेल. अशा वस्तूंची यादी वेळोवेळी विमा कंपनीद्वारे बदलली जाते आणि आम्हाला त्याबाबतीत कळविले जाते.

12.शल्य क्रियेच्या आधीच्या आणि नंतरच्या खर्चाचा दावा करता येतो का?

जर आपल्या पॉलिसीच्या अटींमध्ये नमूद केले असेल तर, तुम्ही रुग्णालयात भरती होण्याच्या 30 दिवस आधीचा आणि रुग्णालयातून सुटल्यानंतरच्या 60 दिवसापर्यंतचा वैद्यकीय खर्चाचा दावा करू शकता. अर्थात हे खर्च तुम्ही ज्या आजारासाठी रुग्णालयात दाखल झाला होता त्याच्याशी संबंधित असले पाहिजे.

13.दंत चिकित्सेच्या खर्चाचा दावा करता येतो का?

नाही, दंत चिकित्सेचा उपचार खर्च केवळ अपघातामध्ये दिला जातो. परंतु अधिक माहितीसाठी पॉलिसी नियम आणि अटी पहा.

14.एका आरोग्य विम्यामध्ये दाव्यांची संख्या मर्यादित आहे का?

दाव्यांची संख्या मर्यादित नाही, पण दाव्यासाठी उपलब्ध रक्कम विम्याच्या उर्वरित रकमेवर अवलंबून आहे.

15.आरोग्य पॉलिसी मुंबई मध्ये आहे आणि दिल्लीला बदली झाल्यास मला दिल्लीमधून दावा करता येऊ शकतो का?

हो, आपली आरोग्य विमा पॉलिसी पूर्ण देशामध्ये कायदेशीर आहे.

16.पॉलिसीच्या पहिल्याच वर्षी मोतीबिंदूच्या शल्यक्रियेच्या खर्चाचा दावा करता येतो का?

सामान्यपणे पॉलिसीच्या नियमांनुसार पहिल्याच वर्षी मोतीबिंदूच्या शल्यक्रियेच्या खर्चाचा दावा करता येत नाही. तरीसुद्धा अधिक माहितीसाठी पॉलिसीचे नियम आणि अटी पहा.

17.आरोग्य विमा पॉलिसी, विकत घेण्यापूर्वी असलेल्या आजाराची परतफेड करते का?

जर आपल्या पॉलिसीच्या नियम आणि अटींमध्ये असे असेल तर "पॉलिसीपूर्व आजारांचा अंतर्भाव केला आहे." परंतु नियम आणि अटींमध्ये विविध पर्याय असतात, त्यामुळे अधिक माहितीसाठी पॉलिसीचे नियम आणि अटी पहा.

18.आरोग्य विमा योजना, रुग्णालयामध्ये डॉक्टरांनी विहित केलेल्या सर्व चाचण्यांच्या खर्चाची परतफेड करते का?

ज्या आजारासाठी विमा धारक रुग्णालयामध्ये भरती झाला आहे, त्यासंबंधित एक्स-रे, रक्त तपासणी, ईसीजी आणि तत्सम चाचण्यांसाठी केलेल्या खर्चाची परतफेड केली जाते.

19.आपल्या नेटवर्क मधील रुग्णालयात उपचार न केल्यास झालेल्या खर्चाची परतफेड केली जाते का?

होय, आपल्या नेटवर्क मधील रुग्णालयात उपचार न केल्यासदेखील झालेल्या खर्चाची परतफेड केली जाते.

20.आरोग्य विम्याअंतर्गत रुग्णालयामध्ये कमीत कमी किती वेळ भरती व्हावे लागते?

सामान्यतः 24 तास किंवा त्यापेक्षा अधिक काळ रुग्णालयात भरती झाल्यास आपण दावा करू शकता. परंतु, डायलिसिस, कीमोथेरपी, नेत्र शल्य चिकित्सा, अस्थि-भंग इत्यादींच्या उपचारासाठी रुग्णालयात भरतीचा काळ हा 24 तासांपेक्षा कमी असू शकतो.

21.आरोग्य विमा पॉलिसी मध्ये जर विम्याची सर्व रक्कम खर्च झाली तर काय होते?

जर विम्याची रक्कम काही मोठ्या वैद्यकीय खर्चामुळे संपली असेल तर, त्या पॉलिसीच्या वैध कालावधीसाठी विमाधारकाला, विमा कंपनी कुठल्याही खर्चाची परतफेड करण्यासाठी जबाबदार राहणार नाही.

22.कॅशलेस सुविधेचा लाभ घेण्याची प्रक्रिया काय आहे?

  • विमाधारक किंवा आजारी व्यक्तीने आपले ओळखपत्र घेऊन टीपीए च्या नेटवर्क मधील रुग्णालयात जावे. याची आपल्याला टीपीए च्या वेबसाईट वरून आणि कॉल सेंटरला फोने करून माहिती मिळू शकते.
  • रुग्णालयीन अधिकारी कॅशलेस विनंती अर्ज भरून, सोबत टीपीए ने दिलेले ओळखपत्र जोडून टीपीए ला फॅक्स करतात. त्यानंतर फोन करून त्याची खातरजमा करून घेणे त्यांच्यासाठी बंधनकारक आहे.
  • टीपीए मार्फत विनंती अर्जासोबत पॉलिसीचा कार्यकाळ, नियम आणि अटी, वैद्यकीय तपशील, रुग्णालयाची माहिती इत्यादी बाबींची तपासणी केली जाते.
  • सर्व कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर, टीपीए एक ठराविक रक्कम मंजूर झाल्याचे अधिकृत पत्र रुग्णालयाला फॅक्स ने पाठविते.
  • रुग्णालयाने पाठविलेला वैद्यकीय तपशील जर अपूर्ण असेल तर, रुग्णालयाकडे त्यांची पूर्तता करण्याची विनंती केली जाते आणि त्यांची पूर्तता झाल्यानंतर अधिकृत पत्र पाठविले जाते.
  • रुग्णालयातून सुट्टी मिळतेवेळी, विमाधारक खर्चाची सर्व रक्कम साक्षांकित करतो आणि बिगर वैद्यकीय खर्चाची रुग्णालयाला परतफेड करतो.
  • उपचारानंतर रोग्याला सुट्टी दिली जाते. रुग्णालय मेडिक्लेम फाईल (मूळ डिस्चार्ज कार्ड, रुग्णालयाची बिले, तपासण्यांचे अहवाल आणि अन्य संबंधित कागदपत्रे) टीपीएला पाठवतात.

23.कॅशलेस सुविधेचा लाभ घेतल्यानंतर, विमा कंपनी रुग्णालयाच्या सर्व खर्चाची परतफेड करते का?

नाही, विमा कंपनीच्या अस्वीकार्य/बिगर-देय वस्तूंच्या यादीमध्ये असलेल्या वस्तूंच्या बिलाची रक्कम विमाधारकाला द्यावी लागते.

24.आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णालयात दाखल व्हावे लागले आणि कॅशलेस सुविधा मिळाली नाही तर काय होते?

अशा वेळी झालेला खर्च विमाधारकाला रुग्णालयाला द्यावा लागेल, परंतु विमा कंपनी तर्फे त्यापैकी स्वीकार्य आणि अधिकृत रकमेची परतफेड केली जाईल.

25.प्रसूतीसाठी होणार खर्च व्यक्तिगत आरोग्य विमा योजनेमध्ये अंतर्भूत असतो का?

जर आपल्या पॉलिसीच्या नियम आणि अटींनुसार "प्रसूतीचा खर्च दिला जाईल" असे असेल तर, तो दिला जाईल. अधिक माहितीसाठी कृपया आपल्या पॉलिसीच्या नियम आणि अटी पहा.

26.रुग्णालयामध्ये आपण जास्तीत जास्त किती रकमेपर्यंतची खोली घेऊ शकतो?

रुग्णालयामध्ये खोलीचे भाडे हे विमा रकमेच्या 1% प्रतिदिन सामान्य खोलीसाठी आणि विमा रकमेच्या 2% प्रतिदिन अतिदक्षता विभाग खोलीसाठी ठरविलेले असते. जर विमाधारकाने या क्षमतेपेक्षा जास्त रकमेची खोली घेतली तर तपासणी, वैद्यकीय भेट, ऑपरेशन थिएटर, शल्यक्रिया, भूलतज्ञ इत्यादी खर्च केवळ आपल्या अधिकृत श्रेणीच्या मान्य रकमेपर्यंत मर्यादित केले जातात.

27.जर भविष्यात मूळ वैद्यकीय कागदपत्रांची गरज पडल्यास काय करावे?

कृपया आपला दावा नोंदविताना, आपल्या सगळ्या कागदपत्रांची एक छायाप्रत करून घ्या. तपासणीनंतर आपले मूळ कागदपत्र आपणास परत दिले जातील, परंतु त्यावर टीपीए ने आपली मोहर लावलेली असेल. साधारणपणे वैद्यकीय औषधयोजनेची कागदपत्रे, वैद्यकीय बिले, रुग्णालयाची बिले आणि डिस्चार्ज सारांश आमच्याकडे ठेवला जाईल. केवळ एक्स-रे, ईसीजी आणि इतर वैद्यकीय कागदपत्रे आमच्या वैद्यकीय विभागाच्या पडताळीनंतर आणि मान्यतेनंतर एक विशेष बाब म्हणून आपणास दिली जातील.